मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांस दहा लाख रुपये आणि नोकरी
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये व एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये व एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मागील सरकारने मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत निर्णय घेतला होता. बुधवारी आम्ही या विषयावर पुन्हा चर्चा केली. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या विषयावर मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. या आंदोलनात ४२ जणांनी बलिदान केले होते. त्यांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करतानाच मृताच्या नातेवाइकाला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. दरम्यान, राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व तीन दंत महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात याच महिन्यापासून १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णयही बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीयऐवजी खासगी विनाअनुदानित कॉलेजात प्रवेश घ्यावा लागला. अशा ११२ विद्यार्थ्यांना दरवर्षी ७ कोटी ४९ लाख ३८ हजार रुपये शुल्क परतावा दिला जाणार आहे. एकूण ३३ कोटी ६ लाख २३ हजार ४०० इतकी एकूण रक्कम होणार आहे.