तेजस्वी यादवांचे टीकाकार होणार ‘खामोश’, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार की तडफदार तेजस्वी यादव बाजी पलटवणार?, देशभरात चर्चा

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा नितीश कुमार विराजमान होणार की तरुण तडफदार तेजस्वी यादव बाजी पलटवणार?, अशी चर्चा देशभरात होत आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते तथा काँग्रेसचे दिग्गज नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये बिहार निवडणूक महागठबंधनच जिंकणार असे सांगत नितीश कुमार तसेच भाजप ‘खामोश’ होईल, असा अंदाज वर्तवला.

“तेजस्वी यादव यांनी दिलेल्या 10 लाख नोकऱ्यांच्या आश्वासनामुळे नितीश कुमारांसह एनडीएच्या पायाखालची वाळू घसरली. बिहारच्या जनतेला तरुण नेतृत्वावर विश्वास आहे. तेजस्वी यांचा धडाकेबाज निवडणूक प्रचार आणि जनतेने त्यांना दिलेली साथ यावरून हे स्पष्ट होते की जनतेला बदल हवा आहे. त्याचबरोबर तेजस्वी यांची युवा ब्रिगेड त्यात समाविष्ट असलेले लव सिन्हा आणि अन्य साथी मिळून बिहारचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास बिहारी जनतेमध्ये दिसून येत आहे”, असे  शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. “बिहारमध्ये महागठबंधनचा विजय निश्चित आहे. कारण लोकांचा कौल देखील तसाच आहे. जनतेला आता बदल हवा आहे. युवा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी, तेजस्वी यादव यांचा उत्साह पाहून विजय आमचाच होणार हा आत्मविश्वास महागठबंधनकडे आहे”, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. “तेजस्वी यादव यांचा अनुभव कमी आहे, असे म्हणणारे विरोधक येत्या 10 तारखेला निवडणूक निकालानंतर पूर्णपणे खामोश होतील. कारण बिहारच्या जनतेला आता जुमलेबाजी नकोय तर विकास करून दाखवणारे सरकार हवे आणि लोकांची हीच अपेक्षा महागठबंधनचे सरकार पूर्ण करेल”, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींवरही चांगलीच टोलेबाजी केली.” नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते, परंतु आता काँग्रेसयुक्त होत आहे”, असे ते म्हणाले.“काँग्रेस पक्षाचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान राहिलेले आहे. काँग्रेस पक्षाची ओळख धाडसी, निडर, अशी राहिलेली आहे. या उलट भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय?”, असा सवाल उपस्थित करत बिहारच्या जनतेने महागठबंधनच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन सिन्हा यांनी केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.