तेज प्रताप यादवांना विजयाचा विश्वास, तेजस्वी भवः बिहार….

बिहारमध्ये सत्तापलट होणार,जवळपास गृहीत,. मात्र प्रत्यक्षात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष

0

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत झंझावाती प्रचार करुन मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सगळे डावपेच निष्प्रभ ठरवणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते (राजद) तेजस्वी यादव यांचे आज काय होणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर देशातील पहिलीच निवडणूक म्हणून बिहारच्या रणसंग्रामाकाडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) फार पूर्वीपासूनच तयारी केली होती. निवडणुकीपूर्वीच संयुक्त जनता दल (जदयू) आणि भाजपकडून बिहारच्या विकासाचा डंका पिटायला सुरुवात झाली होती. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्येनंतर भाजपकडून या मुद्द्याचे राजकीय भांडवल करण्यासाठी पद्धतशीरपणे व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यामुळे अँटी-इन्क्बन्सी फॅक्टरचा फटका बसला तरी बिहारमध्ये नितीश कुमारांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा होरा राजकीय तज्ज्ञांकडून बांधला जात होता. मात्र, प्रत्यक्षात निवडणूक जवळ आल्यानंतर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली अगदी जागा वाटपासून ते पुढील सर्व गोष्टी नियोजनबद्ध रितीने पार पडल्या. अर्थात यासाठी तेजस्वी यादव यांनी अथक मेहनत घेतली. निवडणुकीच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सर्वाधिक 251 सभा घेतल्या. ही आकडेवारी बरेच काही सांगून जाणारी आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मतदारांना वारंवार लालूप्रसाद यादव यांच्या काळातील ‘जंगलराज’ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न झाला. तेजस्वी यादव हाच कित्ता गिरवतील, असे ‘एनडीए’च्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात होते.

मात्र, तेजस्वी यादव यांनी यावर आक्रस्ताळेपणाने प्रतिक्रिया न देता एकएक करुन हा गुंता सोडवला. आपण सत्तेत आल्यास बिहारमध्ये ‘जंगलराज’ची पुनरावृत्ती होणार नाही, हे त्यांनी बिहारच्या मतदारांना सांगितले. आमच्याकडून भुतकाळात चुका झाल्या होत्या, हे त्यांनी खुलेपणाने मान्य केले. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) बॅनर्स आणि संपूर्ण प्रचारातही लालूप्रसाद यादव यांचे साधे छायाचित्रही दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे आपण मुख्यमंत्री झाल्यास ‘राजद’ची कार्यपद्धती पूर्णपणे भिन्न असेल, हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात तेजस्वी यादव यांना यश मिळाले. याशिवाय, भाजपच्या ‘जंगलराज’च्या मुद्द्यावर प्रतिवाद करण्यापेक्षा तेजस्वी यादव यांनी विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला. बिहारमध्ये सत्ता आल्यास 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तेजस्वी यादव यांच्या या घोषणेमुळे ‘जंगलराज’ची भीती आणि भावनिक मुद्द्यांभोवती केंद्रित असलेली भाजपची व्यूहरचना फोल ठरताना दिसली. परिणामी भाजपला आपली नियोजित रणनीती सोडून तेजस्वी यादव यांच्यामागे फरफटत जावे लागले. या सगळ्यामुळे बिहारमध्ये सत्तापलट होणार, हे जवळपास गृहीत धरले जात आहे. मात्र, यापूर्वी एक्झिट पोलचे फोल ठरलेले अंदाज लक्षात घेता याविषयी पूर्ण शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर ‘एनडीए’ला नमवून तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. राज्यातील 55 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. कोरोना पाहता मागील वेळेपेक्षा यावेळी अधिक मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. बिहारमधील 38 जिल्ह्यांतील 55 मतमोजणी केंद्रे आणि 414 हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.