यंत्रणा अॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून स्वागत
शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड निघाले पोहरादेवीतून
यवतमाळ : शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीतून निघाले आहेत. ते कोणत्याहीक्षणी पोहरादेवीत पोहोचणार आहे. राठोड येणार असल्यामुळे पोहरादेवीत त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली असून त्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य वाजवून जल्लोष केला जात आहे. त्यामुळे पोहरादेवीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर तब्बल 15 दिवसांनंतर संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत दर्शनासाठी येत आहेत. राठोड पोहरादेवीला येणार असल्याने या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी होम हवनही करण्यात येत आहे.
पारंपारिक वेशात, ढोलताशांचा गजर
या ठिकाणी अनेक राठोड समर्थक पारंपारिक वेशात आले आहेत. काहींनी तर पारंपारिक वेशात ढोलताशे वाजवून गाणे गात राठोड यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पोहरादेवी परिसरात लोक वाद्य वाजवून नाचत आहेत. बंजारा भाषेतील लोकगीतेही म्हटली जात आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आहे. त्यांना पूजा चव्हाण प्रकरणात बदनाम केले जात आहे, असे राठोड समर्थकांचे म्हणणे आहे. संजय राठोड आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाही यावेळी दिल्या जात आहे. पोहरादेवी येथे राठोड यांचे भाषण होण्याची शक्यता आहे. या परिसरात स्टेज बांधण्यात आले आहे. प्रशासनाने पोहरादेवी संस्थेला केवळ 50 लोकांची परवानगी दिली असली तरी या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे या परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. गर्दी अधिक वाढू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला असून राज्य राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.