‘स्वाभिमानी’च्या महिला जिल्हाध्यक्षाची सटकली, जेसीबीवर चढून तोडफोड
नगरपालिकेचे कचरा ठेकेदारास अनेक वेळा सांगूनही नागरी वसाहतीत कचरा टाकल्याचा आरोप
बीड : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या महिला पदाधिकाऱ्याने चक्क जेसीबी फोडल्याची घटना समोर आली आहे. कचरा टाकण्याच्या वादावरुन पारा चढलेल्या सारिका गायकवाड यांनी जेसीबीवर चढून तोडफोड केली. बीड शहरातील नाळवंडी परिसरात हा प्रकार घडला आहे.
बीड नगरपालिकेकडून नागरी वसाहतीत कचरा टाकत असल्याचा वाद पेटला आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या महिला जिल्हाध्यक्षांना राग अनावर झाला आणि महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड यांनी चक्क जेसीबीवर चढून तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. बीड नगरपालिकेचे कचरा ठेकेदार अनेक वेळा सांगूनही नागरी वसाहतीत कचरा टाकत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. वारंवार सांगूनही हा प्रकार न थांबल्याने सारिका गायकवाडांचा पारा चढला. त्यांनी भररस्त्यातच जेसीबी अडवला. त्यानंतर जेसीबीवर चढून लाकडी दांडक्याने त्यांनी तोडफोड केली. हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.जेसीबीवर चढल्यानंतर सारिका गायकवाड यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. आमच्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, नाहीतर आज जेसीबी फोडला, उद्या नगरपरिषद फोडू, असा इशारा त्यांनी दिला.