‘स्वाभिमानी’ची 19 वी ऊस परिषद होणार ऑनलाईन
कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा, याकडे कारखानदार, ऊसतोड कामगारांचे लक्ष
कोल्हापूर : परिषदेच्या परवानगीबाबत ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज (30 ऑक्टोबर) चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषदआता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने येत्या 2 नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेमध्ये जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केली. मात्र, परिषद शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असली तरी, कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक परंपरा, मेळावे कोरोनामुळे रद्द करावे लागले. त्यामुळे आपणही ऊस परिषद ऑनलाईन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यानंतर 19 वी ऊस परिषद विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर एकमत झालं. दरम्यान, ऊस परिषदेमध्ये दराची घोषणा होण्याआधीच काही कारखान्यांनी ऊसतोडीली सुरुवात केली आहे. ही ऊसतोडणी तत्काळ बंद करावी अशी मागणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांना मजुरीमध्ये 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय 27 ऑक्टोबरला घेण्यात आला आहे. तसेच ऊस परिषदेमध्ये दराची घोषणा होण्याआधीच काही कारखान्यांनी ऊस तोडणीला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने आयोजित केलल्या ऊस परिषदेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे ऊस कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांचे लक्ष लागले आहे.