‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’, ओवेसींचे पंतप्रधान मोदींना आव्हान

ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ केला शेअर, या भाषणात त्यांनी भाजपवर साधला निशाणा

0

हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आव्हान दिले आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओवेसी भाषण करताना दिसत आहेत. या भाषणात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करू, असे वचन दिले आहे. भाजप लडाखमध्ये अशी बहादुरी का दाखवत नाही, जिथे चिनी सैन्यांनी भारताच्या भूमीवर ताबा घेतला आहे”, असे ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले आहेत. तेलंगणाचे भाजप अध्यक्ष आणि खासदार बंडी संजय कुमार यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकबाबत वक्तव्य केले होते. “महापालिकेचे महापौर पद जिंकल्यानंतर भाजप सर्व रोहिंग्या आणि पाकिस्तानींना पळवून लावण्यासाठी जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करणार”, असे भाजप खासदार बंडी संजय कुमार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले. “भाजपवाले तुम्ही असदुद्दीन ओवेसी भडकाऊ भाषण देतो, असे म्हणतात. मी तुम्हाला पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारताच्या भूमीवर चिनी फौजेने ताबा घेतला आहे. नरेंद्र मोदी तिथे सर्जिकल स्ट्राईक करा. आता शांत का बसला आहात?”, असा सवाल ओवेसींनी केला. “तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करा, आम्ही तुमचे कौतुक करू. चिनी फौजेला उखाडून फेका. पण तिथे सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत. तुमचा एक नेता ओल्ड सिटीवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची भाषा करतो. तुम्ही खरंच शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार, तुम्ही शहरासाठी केले तरी काय?”, असादेखील सवाल ओवेसी यांनी केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.