राजकीय आखाड्यात बाप-लेकात रंगले ‘डावपेच’, सुरेश धस यांची मुलासोबत कुस्ती
सुरेश धस हे बीडच्या राजकारणातील मोठे नाव. ‘अण्णा’ म्हणून ते समर्थकांमध्ये लोकप्रिय
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह बॅडमिंटन खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर राजकारणातील आणखी एका ‘दादा’ नेत्याचा मुलासोबत खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातील हे दिग्गज व्यक्तिमत्त्व भाजप आमदार सुरेश धस, खेळ आहे कुस्तीचा.
राजकारण आणि कुस्ती यांच्यात म्हणायला गेले, तर जवळचा संबंध आहे. राजकारणाप्रमाणे कुस्तीतही विविध डाव-पेच असतात. कधी प्रतिस्पर्ध्याला चितपट करावे लागते, तर कधी धोबीपछाड दिली जाते. कधी कोण-कोणाला आस्मान दाखवेल नेम नाही, तर कधी ‘दोस्तीत कुस्ती’ खेळली जाईल, याचाही भरोसा नाही. राजकीय पितापुत्रांमध्ये बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेनिस यासारख्या बैठ्या अथवा मैदानी खेळांचे सामने रंगल्याचे क्वचित आपण पाहिले असेल. मात्र बापलेकातच, तेही राजकीय आखाड्यातील बाप-लेकात कुस्तीसारखा मातीतला, अस्सल रांगडा खेळ रंगल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ नेमका कधी, कुठे शूट झाला, याची माहिती नाही, मात्र सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. सुरेश धस हे बीडच्या राजकारणातील एक मोठं नाव. ‘अण्णा’ म्हणून ते समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत. धस हे सध्या भाजपच्या तिकीटावर विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या अशोक जगदाळे यांचा पराभव करुन सुरेश धस जून 2018 मध्ये अटीतटीच्या लढतीत विधान परिषदेवर गेले. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरेश धस राष्ट्रवादीत होते. त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले आहे. सुरेश धस यांनी 2014 मध्ये बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते.
‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ
आष्टी मतदारसंघात निवडून आल्यानंतर आपण आमदार नाही, तर पाच वर्षांसाठी मतदारांचे सालकरी आहोत, असे सांगत धस यांनी ‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ केली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ऊसतोड आंदोलनाच्या केंद्रस्थानी सुरेश धस आहेत. ऊसतोड आंदोलनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमने सामने आल्या होत्या. ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी संघटनेच्या वतीने पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.