सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांचा मोठा खुलासा

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार यावर सध्या चर्चा होत आहे

0

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही तर त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, अस् सांगून सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असे विधान केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडते. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असे पवारांनी सांगितले. त्यांनी एका मुलाखतीत ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झाले. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा समर्थन असू शकते,” असे शेलार यांनी सांगून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले होते. मात्र, शेलार यांच्या या विधानावर भाजपमधून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांनी लगेचच सारवासारव केली होती. पुण्यात एका पत्रकार परिषदेत शेलार यांनी आमचं सरकार आले तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे सांगितले होते.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा विषय टोलावला असला तरी राजकीय विश्लेषकांनी मात्र, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतील, असा दावा केला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. आजची विधाने उद्या कायम असतील असे नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही राष्ट्रीय राजकारणातच रस होता. पण हायकमांडचे आदेश मिळाल्यानंतर ते राज्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यामुळे काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर, सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह चार दोन महिला राजकारण्यांची नावे कायमच मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असतात, त्यात काही नवीन नाही. तसेच राजकारणात उद्या काय घडेल हे आताच सांगणे शक्य नाही, असे राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.