आज ‘यूजीसी’च्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्यांच्या सरकार परीक्षा घेण्यास विरोध. 'यूजीसी' मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत आज (10 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘यूजीसी’ने तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे.
यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. 640 पैकी 454 विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे ‘यूजीसी’ने सांगितले आहे. ‘यूजीसी’च्या परीक्षासक्तीला 31 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जीव धोक्यात घालणे हितावह नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. जितकी सत्र (सेमिस्टर) झाली, त्यांच्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात घेतला होता. ज्यांना आपण सरासरीपेक्षा अधिक गुण मिळवू शकलो असतो, असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. यूजीसीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत म्हटले की, 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे भविष्य सांभाळणे हे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वर्षाच्या अभ्यासाला उशीर होऊ नये आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये. तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा थांबवली आहे, यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी, असेही यूजीसी म्हटले.