पोतरा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँक शाखेकडून घेतले 90,000 रुपयांचे पीककर्ज

0

हिंगोोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिके हातची गेल्याने बँकेचे 90,000 रुपयांची कर्ज कसे फेडावे, या चिंतेमुळे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील देवजी रावजी झुंगरे (50) यांना तीन एकर शेती आहे. या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. शेतात काम नसल्यावर रोज मजुरीची कामेदेखील ते करतात. यावर्षी त्यांनी आखाडा बाळापूर येथील भारतीय स्टेट बँक शाखेकडून 90,000 रुपयांचे पीककर्ज घेतले होते. त्यानुसार त्यांनी शेतात तीन एकरवर सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र पेरणीपासून ते काढणी पर्यंत सतत पाऊस लागून राहिला. त्यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंबे फुटली. पिकाचे नुकसान झाल्याने लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, गुरुवारी (ता. 29) दुपारी ते शेतात गेले. शेजारी शेतकऱ्यांना बोलून ते बैलांना पाणी पाजण्यासाठी जात असल्याचे कारण सांगत शेतातील एका कोपऱ्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने खाली काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी रावजी देवजी झुंगरे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक मुपडे पुढील तपास करीत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.