राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
मी स्वतःला वेगळे करून घेतले असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांच्या संपर्कात अनेक नेते, गावकरी आले होते. याशिवाय त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्यांची भेट घेत फडणवीसांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ, दौंड, भिगवण, इंदापूर, परंडा, टेंभुर्णी येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.