राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण, राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोना

रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची दिली माहिती

0

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी दिवसभरात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली. त्यानंतर रात्री उशिरा राजेश टोपे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असे राजेश टोपे ट्विटरवर म्हणाले आहेत.

राज्याचे लढवय्या आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राजेश टोपे संयमीपणे निर्णय घेऊन आरोग्य विभागाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या वर्षभरात अनेक आव्हाने होती. या सर्व आव्हानांना तोंड देत राजेश टोपे लढत राहीले. 2020 च्या एप्रिल ते जून हा कालावधी कोरोनासाठी प्रचंड भयानक होता. या काळात त्यांनी उभारलेली यंत्रणा खरंच कौतुकास्पद होती. त्यांच्या कार्यामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. ते अद्यापही राज्यातील विविध भागांमध्ये स्वत: जाऊन आढावा घेत होते. कोरोना संकट काळात त्यांच्या आईचेदेखील निधन झाले. मात्र, एवढे मोठे दु:ख सोसत ते राज्यात उपाययोजना करत होते. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्यांना लढवय्या आरोग्यमंत्री देखील म्हटले जाते.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट भयानक, अनेक मंत्र्यांना लागण

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा आहे. या लाटेचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल 5427 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक मंत्र्यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर गुरुवारी दिवसभरात तीन मंत्र्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.