तेजस्विनी जाधवांच्या आशीर्वादाने सभेत भाषण, हर्षवर्धन जाधव यांची मैत्रीण इशा झा यांची चर्चा
हर्षवर्धन जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात
औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या राजकीय सभेत भाषण करणाऱ्या त्यांच्या सहकारी आणि मैत्रीण इशा झा सध्या चर्चेत आहेत. “कधीही कुठला प्रॉब्लेम आला, तरी राजकीय नेत्याकडे जाऊ नका, कारण आपल्या देशातील नेताच सगळ्यात मोठा गुंड आहे” असे म्हणत इशा झा यांनी राजकारणातील गुंडशाहीवर बोट ठेवले. या सभेत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचे गुणगानही गायले.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित सभेत आपली आगामी रणनीती जाहीर केली. या सभेत इशा झा यांनी भाषण केले. जाधवांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांचे आशीर्वाद घेत इशा झा यांनी भाषणाला सुरुवात केली. “आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र कुटुंबाकडून हेच शिकले, की कधीही कुठलीही अडचण आली, तरी राजकीय नेत्याकडे जाऊ नका, कारण आपल्या देशातील नेताच सगळ्यात मोठा गुंड आहे. ऐकून खूप आश्चर्य वाटायचे, नंतर तसे अनुभवही आले. अनेक नेते चौथी नापास आहेत. आमच्याकडूनच पैसे घेतात आणि आमचेच हक्क हिरावतात अन् अधिराज्य गाजवतात,” असे इशा झा भाषणात म्हणाल्या.
“लोकप्रतिनिधींना लागत नाही डिग्री”
“देशाविषयी प्रेम असल्यामुळे नेत्यांकडून होणारी लूट पाहून दुःख व्हायचे. सैन्यात जायचे असेल, तर कठोर मेहनत लागते. डॉक्टर व्हायचे तर पाच सहा वर्षे शिकून डिग्री मिळवावी लागते, इंजिनिअरला डिग्री लागते. मात्र लोकप्रतिनिधी होण्यासाठी कुठलीही डिग्री लागत नाही. कोणीही शिक्षण किती झाले, हे विचारत नाही. मान्य आहे की, आपल्या देशात लोकशाही आहे, लोकच ठरवतात की, त्यांचा नेता कोण. पण लोकांची जबाबदारी आहे की, आपण कोणाला निवडत आहोत, हे पाहावे. त्याला समजते का, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे का, हे पाहावे,” असा सवाल इशा झा यांनी विचारला.
“हर्षवर्धन जाधवांच्या ज्ञानाने अधिकारी गपगार”
“मी जेव्हा हर्षवर्धन जाधव यांना भेटले, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण लंडनमधून झाले आहे. ते जेव्हा कलेक्टर, लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतात, तेव्हा हर्षवर्धन यांच्या ज्ञानाने तेही गपगार होतात. आणेवारी, वीज कनेक्शन, आरोग्य, हायवे बांधकाम, असा कुठलाही विषय असो, त्यांचा अभ्यास खूप आहे” अशा शब्दात इशा झा हर्षवर्धन जाधवांचे कौतुक करत होत्या.
संत कबीर यांच्या दोह्याने भाषणाची अखेर
“आयुष्यात कितीही खाचखळगे आले, तरी हर्षवर्धन जाधव जनतेसाठी पुन्हा उभे राहिले. समाजाचा विकास आणि जातपात नष्ट करण्यासाठी ते झटत आले आहेत. संत कबीर यांचा दोहा इशा झांनी भाषणाच्या अखेरीस सांगितला. “बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर, पंछी को छाया नही, फल लागे अतिदूर..” म्हणजेच तुम्ही कितीही मोठे व्हा, त्याचा समाजाला फायदा झाला नाही, तर त्याचे काहीच महत्त्व नाही” असा अर्थ सांगत इशा झा यांनी साडेपाच मिनिटांच्या भाषणाची अखेर केली.
कोण आहेत इशा झा?
इशा झा या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सहकारी. जाधव यांच्या साथीने त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना बालपणापासूनच समाज कल्याणाविषयी मनात तळमळ होती. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबात इशा झा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मेकॅनिक होते. शिक्षण, आरोग्य अशा विषयात इशा झा यांनी काम केले आहे.
दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी चर्चेत
हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इशा झा यांनीही संगनमताने शिवीगाळ करत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारदार अमन अजय चड्डा यांनी केला होता.