ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सून, रक्षा खडसेंचे एकनाथ खडसेंना आव्हान

खडसे भाजपात असताना ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व

0

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ मनगटावर बांधले.  मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसेंनी हातातले कमळ काही सोडलेले नाही. आणि त्यामुळेच आता मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून, अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. आणि याला ग्रामपंचायत निवडणुका कारणीभूत ठरू शकतात.

मुक्ताईनगरमध्ये 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. आणि यामध्ये ग्रामपंचायती जिंकण्याची जबाबदारी भाजपकडून रक्षा खडसेंवर असेल, तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर ती जबाबदारी एकनाथ खडसेंवरच येणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस वाढली. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. चंद्रकांत पाटलांच्या रुपाने शिवसेनेचा कडवा विरोध एकनाथ खडसेंना होता. मात्र, आता खडसेच राष्ट्रवादीत आल्याने आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असल्याने हा विरोधही कमी झाला आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजप कमकुवत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जळगावातील 783 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यात मुक्ताईनगरच्या 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना मागील निवडणुकांत  48 ग्रामपंचायतींवर कमळ उमलले होते. मात्र, आता कमळ उमलवणाऱ्या खडसेंच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आले आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 15 जानेवारी 2021 ला येथे ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीवर काय म्हणाल्या रक्षा खडसे?

मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीबाबत भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसेंनी प्रतिक्रीया दिली. त्या म्हणाल्या,  “भाजपची खासदार असल्यामुळे ग्रामपंचायतीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे, असेच माझे प्रयत्न राहणार आहेत. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करतील, पण मला विश्वास आहे की, येथे गावागावांत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, आणि त्यामुळेच भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील”

खडसेंच्या गावातही ग्रामपंचायतीची निवडणूक

एकनाथ खडसे हे मूळचे मुक्ताईनगरमधील कोथळी या गावचे. त्यांच्या गावातही यंदा निवडणुकी लागल्या आहेत. आतापर्यंत खडसेंच्याच पक्षाला या गावाने निवडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आधी भाजपने येथे सत्ता मिळवली. मात्र, यंदा ही सत्ता राष्ट्रवादी आणि महाविकासच्या पारड्यात जाणे निश्चित मानले जाते आहे. मात्र, त्यातच रक्षा खडसेही येथे जोर लावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

मुक्ताईनगरमध्ये गिरीश महाजन संकटमोचक ठरणार?

भाजप संकटात असताना संकटमोचक म्हणून अवतरणारे गिरीश महाजन यंदा जळगावात आपला चांगला जोर लावणार आहे. गिरीश महाजन हेही जळगावचेच असल्याने त्यांच्या काही भागात चांगला प्रभाव आहे. मात्र, मुक्ताईनगरचा विचार केला तर एकनाथ खडसेंचं पारडे जड ठरते. म्हणूनच रक्षा खडसे आणि गिरीश महाजन हे दोघेही येथे जोर लावतील. राष्ट्रवादीकडून येथे अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गाव दत्तक घेण्याचीही योजना घोषित करण्यात आली आहे. याचाही फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्याने काही नुकसान होत नाही, असे अनेकदा भाजपकडून सांगण्यात आले. पण जमिनीवर एकनाथ खडसेंची ताकद मोठी आहे. त्यातच त्यांना कडवी झुंज देणाऱ्या शिवसेनेचे चंद्रकांत पाटीलही महाविकाससाठी जोर लावतील. त्यामुळेच जळगावात महाविकास आघाडीविरुद्धचा हा सामना भाजपसाठी जिकीरीचा ठरणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.