कोरोना संपवणार तरी कसा, यंत्रणा सुस्तावली; नागरिकही बिनधास्त
क्वाॅरंटाइन करणे, त्यांची टेस्ट घेणे हा प्रकारच सध्या बंद झाल्यात जमा
उस्मानाबाद : सध्या कोरोनाचा कहर जोमाने बरसत असताना यंत्रणा पूर्णपणे सुस्तावली आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांना क्वाॅरंटाइन करणे, त्यांची टेस्ट घेणे हा प्रकारच सध्या बंद झाल्यात जमा आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येणे अशक्य झाले आहे.
मार्चमध्ये कोरोनाची लागण होण्यास प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य यंत्रणा अत्यंत सतर्क होत्या. एप्रिलपासून जुलैपर्यंत एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरिस्क काँटॅक्टमधील रुग्णांचा शोध घेतला जात होता. बहुतांश ठिकाणी तर मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून रुग्ण कोठे फिरला, कोणाला भेटला याचा मागोवा घेतला जात होता. घरातील सर्व नातेवाइकांना ताब्यात घेऊन त्यांना क्वाॅरंटाइन करण्यात येत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात येत हाेते. काेरोनाग्रस्त रुग्णावर लगेच उपचार सुरू होते. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत कमी होती. ऑगस्ट, सप्टेंबरपासून मात्र काँटॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे ढेपाळली आहे. आता रुग्णांना अधिक त्रास जाणवत असेल तर तेच स्वत:हून रुग्णालय गाठत आहेत. तरीही त्याच्या संपर्कातील व्यक्तींना शोधले जात नाही. एवढेच काय एखादा रुग्ण मृत झाला असेल तरीही ट्रेसिंग केली जात नाही. सध्या महसूल व पोलिस यंत्रणेमधील अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. नागरिक थेट रस्त्यावर मास्क न लावता गर्दी करत आहेत. सॅनिटायझरही वापरले जात नाही. हे तर सुरूच असून पाॅझिटिव्ह रुग्णही आपल्या संपर्कातील नागरिकांचे नाव सांगत नाही. अनेकजण तर तपासणी करण्यासाठीही नकार देत आहेत. काहीअंशी याला नागरिकही जबाबदार आहेत. सद्य:स्थितीत एका रुग्णाच्या पाठीमागे ९.७ व्यक्तींची ट्रेसिंग करण्याचे निर्देश आहेत. मात्र, आता एका रुग्णाच्या पाठीमागे चार व्यक्तींचीही ट्रेसिंग केली जात नाही. विशेष म्हणजे सामूहिक संसर्ग वाढला असतानाही यंत्रणा अपुरी पडत आहे. आशा व अंगणवाडी स्वयंसेविकांनी या प्रक्रियेतून अंग काढून घेतल्यासारखी परिस्थिती आहे.
आरोग्य यंत्रणा अद्यापही सक्षमतेने काम करत आहे. मात्र, काही नागरिकच प्रतिसाद देत नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात १९ आशांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
यंत्रणेमध्ये सध्या अनेक दोष आढळत आहेत. उस्मानाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाची थेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. त्यांच्यावर १४ दिवस उपचार करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह नसल्याचे आढळून आले होते. सामान्य नागरिकांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्याचे आवाहन करत असताना अनसुर्डा (ता. उस्मानाबाद) येथे कोरोनाग्रस्त रुग्ण व इतरांना १९ जणांना एकाच वाहनातून नेण्यात आले. बेंबळीतील हायरिस्क १४ जणांना उस्मानाबादला नेल्यावर त्यांनी अँटिजन टेस्ट घेतली. मात्र, टेस्ट घेणाऱ्यालाच कोणत्या क्रमाने उभे केले हेच समजले नाही. यामुळे त्याने अंदाजानेच पॉझिटिव्ह रुग्ण सांगितले.