भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप

महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यांवर, राजकीय घडामोडींना वेग

0

अहमदनगर :  ”भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला. तर स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असंही संग्राम जगताप यांनी सांगतिले.

महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यांवर आली. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहावयाला मिळेल, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. नगरमध्ये सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. भाजपचा सभापती पदाचा उमेदवारच राष्ट्रवादीत दाखल झाल्याने नगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर  यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेतला. सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतल्याने कोतकर बिनविरोध निवडून आले. अहमदनगरला स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्याने, मनोज कोतकर हे बिनविरोध सभापती झाले आहेत. तर सभापतीची निवडणूक होती यामध्ये मागच्या आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन सर्वांनी निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेनेने राष्ट्रवादीला स्थायी समिती पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं मंत्री गडाख यांनी सांगितले. वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे तीनही पक्ष एकत्र आले आणि आता हळूहळू पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे गडाखांनी म्हटले.

पारनेरचा नाराजीनामा

दरम्यान, अहमदनगरच्या स्थानिक राजकारणातील खेळी नवीन नाही. पारनेरमधील पाच नगरसेवकांनी जुलै महिन्यात शिवसेना-राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली होती. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत या नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर पुन्हा ‘शिवबंधन’ हाती बांधले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.