…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो, रत्नाकर गुट्टेंनी सांगितले ‘कारण’

माझा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भाने आम्ही पवार साहेबांना भेटलो

0

नांदेड : माझा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आम्ही पवार साहेबांना भेटलो, असा खुलासा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला. रासपचे नेते महादेव जानकर यांच्याबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली,

रासपचे नेते महादेव जानकर यांच्याबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर नांदेड विमानतळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. रासपचे नेते महादेव जानकर यांनी आज अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतल्याने भाजपचा आणखी एक मित्र दुरावणार, अशा चर्चांना उधाण आले. या सर्व चर्चा चुकीच्या असून, साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही दोन्ही नेत्यांना भेटलो, असे स्पष्टीकरण आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिले आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आले होते. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामील होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबते झाल्याचे सांगण्यात येते. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचे जाहीर केले आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. तसेच पवारांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला.

जानकरांची नवी जुळवाजुळव? : नुकत्याच झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेले अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेले यश… या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. जानकरांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते मात्र, स्वत: सत्तेच्या पदापासून दूर आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचे कामही थंडावले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकरांकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

पराभवानंतर भाजपचे चिंतन; पण मित्रपक्षांना वगळून

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्याबाबत चिंतन केले. या चिंतन बैठकीला भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बदलत्या राजकीय गणितांचा आढावा घेण्यात आला, तसेच नव्या स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीत महायुतीतील एकाही मित्र पक्षाला बोलावण्यात आले नव्हते. तसेच भाजपने अजूनही मित्रपक्षासोबत या निवडणूक निकालाबाबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे मित्र पक्षांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.