…तर ऊसतोड कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावे, पंकजा मुंडेंचे आवाहन
ऊसतोड कामगारांच्या मजुरीत किमान 21 रुपयांची दरवाढ, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची मागणी
बीड : ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन पंकजा मुंडे यांनी कामगारांनी आता ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन केले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून ठेवला होता. या सत्कार समारंभामध्ये पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या दरवाढीबाबत आपली भूमिका जाहीर केली. “कारखानदारांनी ऊसतोड कामगारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही. आता एवढी तरी दानत ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऊसतोड कामगारांच्या संपात राजकारण होत आहे, त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याने हा विषय आता येथेच संपवावा आणि कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावे”, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत दुर्गाष्टमीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी नुकतीच केली होती, परंतु यात तोडगा न निघाल्याने त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार जर 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कामगारांनी ऊसतोडीसाठी निघायला हरकत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणे गरजेचं असल्याचं पंकजा म्हणाल्या. राज्यातील ऊसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. पण कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण चालले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
‘वंचित’चा मेळावा, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष
ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना वाढीव दर मिळावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला. उद्या पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी वंचितने मेळावा आयोजित केला. ऊसतोड मजुरांबाबत उद्या प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतील, याकडे राज्याचे लक्ष वेधले असतानाच आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांनी मजुरांचा ऊसतोडणीसाठी निघावं असं आवाहन केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या वंचितच्या ऊसतोड मजुरांच्या मेळाव्याला किती ऊसतोड मजूर उपस्थित राहतील हा प्रश्न आहे.