‘…म्हणून फडणवीस सरकारने दाबले’अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण

आरोपीचे भाजपशी असलेले थेट संबंध कारणीभूत, असा काँग्रेसने केला आरोप

0

मुंबई : ‘अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी हे भाजपसाठी काम करतात म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने अन्वय नाईक यांचे आत्महत्या प्रकरण दाबले,’ असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
अन्वय नाईक आत्महत्या व या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीन व्यवहार झाल्याची माहिती पुढे आणली आहे. मात्र, नाईक कुटुंबीयांनी हे सगळे व्यवहार खुले असल्याचे म्हटले आहे. अर्णव गोस्वामी यांना पाठिशी घालण्यासाठी सोमय्या हे आरोप करत आहे,’ असे आज्ञा नाईक यांनी म्हटले आहे. त्यानंतरही सोमय्या या व्यवहारावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. सचिन सावंत यांनी सोमय्यांच्या या आरोपांचा समाचार घेतला. ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जमीन व्यवहाराला मधे आणून आपली व भाजपाची हीन मानसिकता दर्शवली,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे. भाजप आणि अर्णव गोस्वामी यांच्या संबंधांबाबतही सावंत यांनी गौप्यस्फोट केला. ‘रिपब्लिक चॅनेलमध्ये भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे भागीदार होते. गोस्वामी यांचा भाजपशी थेट संबंध आहे. फडणवीस सरकारने आत्महत्या प्रकरण दाबले. कारण आरोपी भाजपशी संबंधित आहे. भाजपसाठी काम करतो. भाजप हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा आहे हे स्पष्ट आहे,’ असेही सावंत यांनी म्हटले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.