काँग्रेसची विचारधारा जपणारी दोन घरांणी तब्बल साठ वर्षांनंतर एकत्र

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर कट्टर वैरी एकाच व्यासपीठावर

0

सातारा  : स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची विचारधारा जपणारी दोन घरांणी तब्बल साठ वर्षांनंतर एकत्र आली. माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे हाडवैरी एकाच व्यासपीठावर दिसले. त्याचे निमित्त होते, विलासकाकांचे सुपुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा काँग्रेसमधील प्रवेश.

पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर हे एकमेकांचे किती कट्टर वैरी होते, याची झलक 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याने पाहिली. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मतदारसंघात विलासकाका उंडाळकरांनी खिंडीत गाठले होते. पृथ्वीराज चव्हाणांनी 2014 आणि 2019 मध्ये बाजी मारली असली तरी त्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना किती घाम गाळावा लागला हे महाराष्ट्राने पाहिले. हेच हाडवैर आज संपले. कराडचा कृष्णाकाठ आज विलासकाका पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वैर संपताना पाहतो आहे. गेल्या 6 दशकांत काँग्रेसमध्येच राहून हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिले. मात्र, दोघांनीही वेगळ्या विचारधारेशी समझोता केला नाही. दोघेही काँग्रेसमध्येच राहिले. विलासकाकांच्या सुपुत्राने पृथ्वीबाबांचे नेतृत्त्व स्वीकारले, मात्र त्याचवेळी विलासकाका आणि पृथ्वीबाबांचा वारस आपणच आहोत, असे म्हणत उदयसिंह पाटील उंडाळकरांनी आपला डाव टाकला. विलासकाका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय वारसदाराचे अप्रत्यक्ष लॉंचिंग आज होत आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. तसे पाहता, उदयसिंह पाटील यांना काँग्रेस काही नवी नाही. कारण उंडाळकर घराण्याने काँग्रेसची विचारधारा स्वातंत्र्य पूर्वकाळापासून जपली आहे. विलासकाका उंडाळकर हे सलग 35 वर्षे कराड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतून महाराष्ट्रात आले आणि उंडाळकर-चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडली.

पक्ष एक… मतदारसंघ एक… आणि उमेदवार दोन… याच पेचातून हे वैर सुरू झाले. पृथ्वीराज चव्हाणांचे आई आणि वडील दोघेही खासदार. त्यामुळे त्यांनाही खासदारकीची संधी आली. त्यामुळेच नाराज होऊन विलास पाटील उंडाळकरांनी वेगळा गट तयार केला. आमदार म्हणून उंडाळकरांना मंत्रिपदासाठी संधी मिळाली आणि 7 टर्म म्हणजेच तब्बल 35 वर्षे उंडाळकरांचे कराड मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व राहिले. तर पृथ्वीराज चव्हाण केंद्रात गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण तर कराडमध्ये विलासकाका उंडाळकर यांचे स्थान कायम राहिले. काँग्रेसने 2014 मध्ये विधानसभेचे तिकीट अर्थातच तत्कालीन मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालं. त्यामुळे 35 वर्षे गड सांभाळणारे विलासकाका संतापले आणि त्यांनी पृथ्वीबाबांना आव्हान दिले. नाराज झालेल्या विलासकाकांनी अपक्ष उभे राहत पृथ्वीबाबांना कडवे आव्हान दिले. या निवडणुकीत पहिल्यापासून ग्राऊंडवर असलेल्या विलासकाकांना सुरुवातीला प्रचारात फायदा मिळाला. मात्र मुख्यमंत्रिपद सांभाळून प्रशासनावर छाप सोडणाऱ्या पृथ्वीबाबांनी हळूहळू कराडकरांना आपलेस केले. पृथ्वीबाबांची प्रचंड दमछाक झाली, मात्र विजयी टिळाही त्यांनाच लागला. पृथ्वीराज चव्हाणांनी विलासकाका उंडाळकरांच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. यानंतर दोन्ही घराण्यांत वैराची साखळी आणखी पक्की झाली. 2019 मध्ये उदयसिंह उंडाळकर पृथ्वीबाबांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र, तिथेही त्यांना पदरी निराशाच आली. पण, आता हे हाडवैर संपले… आणि हे वैर संपवण्यात गृह राज्यमंत्री सतेज पाटलांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटलांनी उंडाळकरांची राजविलास पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली आणि वैर संपवत दिलजमाई करण्याकडे पहिले पाऊल टाकले. कराड हा काँग्रेसचा गड. मात्र, एवढी वर्षे या गडाला दोन किल्लेदार होते. जे आता निवृत्त होणार आहेत. विलासकाका उंडाळकर आता 82 वर्षांचे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण 74 वर्षांचे. विलासकाकांनी आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यापुढे निवडणुका लढवण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळेच पृथ्वीबाबा आणि विलासकाकांचा राजकीय वारसदार म्हणून उदयसिंह पुढे आले आहेत. काँग्रेसमधील चव्हाण आणि पाटील गटाचे आता विलिनीकरण होत आहे. त्यामुळे आता कराड मतदारसंघात आता काँग्रेस अधिक मजबूत होईल, यात शंका नाही.

कराड दक्षिणला आतापर्यंत तीनच आमदार!

कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच विधानसभेचे आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. पहिल्यांदा ज्येष्ठ  नेते यशवंतराव मोहिते यांनी कराड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर हे कराड दक्षिणचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले. अशा प्रकारे कराड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत तीनच आमदार पाहिले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.