राज्यात सलून व्यावसायिकांनी उघडली दुकाने

ग्राहक संख्या रोडावल्याने जगणे झाले मुश्कील

0

औरंगाबाद : कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सलून व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. आता ‘अनलॉक’नंतर उदरनिर्वाह चालावा म्हणून कोरोना संक्रमणाच्या काळात सलून व्यावसायिक रिस्क घेऊन काम करायला तयार झाले आहेत. सध्या राज्यातील ८५ टक्के सलून दुकाने उघडली आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकच फिरकेनासे झाले. त्यातच श्रावणमासानेही भर टाकली आहे.

कोरोना व श्रावण या दुहेरी कचाट्यात सापडल्यामुळे सलून व्यावसायिकांचा रोजचा धंदा २५ टक्क्यांवर आला आहे. केवळ हेअर कट किंवा कटिंगलाच परवानगी असल्यामुळे मोजके ग्राहक येत आहेत. दाढी, मसाज, फेशियल, हेअर कलर डाय करण्यास बंदी असल्याने हा ग्राहक पूर्णपणे बंद झाला आहे. काही लोक श्रावणात केस कापणे वर्ज्य मानतात. श्रावणमासात सलून व्यवसाय तसाही थंडच असतो. पण यावर्षी ‘कोरोना’ने त्यात भर पडल्याने तो अधिकच ‘गार’ पडला आहे. दिवसाला चार ते पाच ग्राहक येत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यातच शासनाच्या अटी-शर्तीनुसार सलून व्यवसायासंदर्भात शासनाने स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना पाहता ग्राहकांना सेवा पुरवताना कटिंगच्या दरात वाढ केल्याचा परिणामही या व्यवसायावर किंचित झाला आहे. सध्या १०० रुपये कटिंगचा दर हा सर्वसाधारणपणे प्रचलित आहे. या दरवाढीपेक्षाही जास्त परिणामकारक ठरली आहे. लोकांच्या मनात कोराेना संसर्गाची भीती. राज्याच्या अनेक ग्रामीण भागातून शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या बहुतांश तरुण सलून व्यावसायिकांची दुकाने तसेच घरेसुद्धा भाड्याचीच आहेत. एकट्या औरंगाबादमध्ये २० टक्के सलूनचालकांनी गाळ्याचे भाडे दिले नाही म्हणून मालकांनी गाळे रिकामे करायला सांगितले आहे. त्यामुळे शहरातील अनेक सलून दुकानांचे चार महिन्यांनंतरही शटर उघडलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक तरुण सलून कारागिरांनी आपल्या दुकानाचा गाशा गुंडाळून घरसंसाराचा गाडा चालावा म्हणून शहरात भाजीपाला विक्री, दूध डेअरी, किराणा दुकानावर काम करणे सुरू केले आहे. अनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी ट्रीमर विकत आणून कटिंग करणे सुरू केल्याने त्याचा परिणाम ग्राहक संख्या कमी होण्यावर झाला. कोरोनाआधी एका सलून दुकानात सरासरी दिवसांतून वीस ते पंचवीस ग्राहक येत. आता मोठ्या मुश्किलीने चार ते पाच ग्राहक येत आहेत. त्यामुळे ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे त्यांना कठीण झाले आहे. 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.