…तेव्हा कुठे गेलती भाजपाची नैतिकता? शिवसेनेला शिकवण्याचा अधिकार नाही

0

आपण फार मोठे नैतिक वगैरे आहोत असा दावा भाजपने करू नये. त्या नैतिकतेच्या फडक्याला कमरेवरून सोडून कसा आणि कितीवेळा झेंडा म्हणून मिरवलंय ते बिहार, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि अगदी आता त्या हरयाणामध्ये पण आम्ही पाहिलेले आहे. गोव्यात आणि मणिपूरमध्ये राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं पण नव्हतं. राज्यपाल भवन कुणाच्या इशा-यावर चालतं हे देशाला माहीत नाही काय?

किमान शिवसेनेने इथे सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा अवसर तरी दिला.

बाकी अनैसर्गिक युती वगैरे भाजपने बोलली की त्यांच्या पक्षातलेच लोक खाजगीत पोट धरून हसत असतील. जर काही अनैसर्गिक असेल तर ते सुरू आहे तामिळनाडूमध्ये. तिथे अण्णा द्रमुकमध्ये फोडाफोडी करून त्यातल्याच एका गटाला हाताशी धरून दुसऱ्यावर कुरघोडी करत ज्या रीतीने भाजप अप्रत्यक्ष सरकार चालवत आहे तो प्रकार निसर्ग नियमाच्या कुठल्या व्याख्येत बसतो?

महाराष्ट्रातली आजच्या राजकीय समिकरणांना आणि अस्थिरतेला भाजप आणि केवळ भाजप जबाबदार आहे. मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द पाळला नाही, अमित शाह आणि फडणवीस खोटं बोलत राहिले हे आता सामान्य लोकंसुद्धा स्पष्टपणे बोलत आहेत. अश्याकाळी राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या आडून सत्ता गाजवायचे मनसुबे लपून राहिलेले नव्हते.

राज्य ओल्या दुष्काळाच्या स्थितीत असताना स्वतःचा दिलेला शब्द पाळायचे सोडून मित्रपक्षाला आणि नंतर राज्याच्या जनतेला फसवणं हे सगळ्यात जास्त अनैतिक आहे.

सरकार कुणाचं बनेल, कसं बनेल आणि कधी बनेल हे मला ठाऊक नाही. पण नैतिक अनैतिकतेच्या गप्पा भाजपने मारायला सुरुवात केलीय बघून हे लिहिलंय!

— अमेय तिरोडकर  ( लेखक प्रसिद्ध पत्रकार आहेत )

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.