शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात

दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित

0

मुंबई : शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी 50 जणांच्या उपस्थिततीत पार पडणार. त्यामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सायंकाळी सातच्या मुहुर्तावर हा मेळावा होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि मग ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करतील. तसेच, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या पत्रकार बांधवांसाठी बाजूलाच म्हणजे संयुक्त महाराष्ट्र दालन येथे “पत्रकार कक्ष” उभारण्यात आला आहे. पत्रकार कक्षातून प्रसार माध्यमे ‘थेट प्रक्षेपण’ करू शकणार आहेत. छायाचित्रकारांना स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रवेशबंदी असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधने कायम आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात दसरा मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचे व्यासपीठ उभे करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केले जाईल.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.