कलावंत संमेलन रंगणार दोन दिवस सोबतच शरद पवार यांची मुलाखत
पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदा दि. 28 आणि दि. 29 डिसेंबर रोजी साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहेत. यावर्षी संमेलनाचे अध्यक्षस्थान संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, लेखक डॉ. रामचंद्र देखणे भूषवणार असून राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. तर यंदा ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले आणि अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ‘वाग्यज्ञे साहित्य’ आणि ‘कला गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासह कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हे संमेलन होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमांचा पुणेकरांनी लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.