शरद पवारांना मराठा आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे : विनायक मेटे

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्यासाठी अशोक चव्हाण हेच जबाबदार

0

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मराठा आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समलिंगी आणि तृतीयपंथीयांसाठी वेगळी शाखा तयार करण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार यांना वेळ मिळतो. केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यावर त्यांच्याकडे वेळ नसतो, असे विनायक मेटे यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. या प्रकरणाची पाच सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. मागच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्यासाठी अशोक चव्हाण हेच जबाबदार आहेत. आम्हाला आता त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा उरलेल्या नाहीत, असे विनायक मेटे यांनी म्हटले. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहोत. मात्र, ते घराबाहेर पडत नसल्याने आम्ही 7 सप्टेंबरला ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा घेऊन जाणार आहोत. तसेच काँग्रेस पक्षाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही? मराठा समाजाला आरक्षण न मिळून देणे, हा काँग्रेसचा अजेंडा आहे का?, हे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.

‘विजय वडेट्टीवारांना बनायचे आहे, ओबीसींचा मसिहा’

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाचा मसिहा बनायचे आहे, अशी टिप्पणी विनायक मेटे यांनी केली. मात्र, कोणाचेही वाईट चिंतून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, असे मेटे यांनी वडेट्टीवारांना सुनावले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.