शांतिगिरी महाराजांच्या मातोश्री जगदमाऊली फुलामाता यांचे निधन
सुलतानपुर : कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगदमाऊली फुलामाता यशवंत कांडेकर (वय 92 ) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातील भाविकांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी धार्मिक,सामाजिक, राजकीय यांसह जय बाबाजी भक्त परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी मोठी उपस्थिती होती.
फुलामाता यांच्या निधनाची बातमी कळताच महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवारातील भाविकांनी मातोश्री फुलामातांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. प्रारंभी लाखलगाव येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाजवळील पटांगणात मातोश्रींच्या पाद्यपूजन , दर्शन सोहळा झाला. यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ब्रह्मवृंदाच्या मंत्र घोषात मातोश्री फुलामातांचे पाद्यपूजन केले. आश्रमीय संत यांनीही यावेळी विधिवत पाद्यपूजन करून श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करताना मातोश्री फुलामातांच्या आठवणी सांगितल्या.
यावेळी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून जन्मदात्या आई आणि सदगुरु माऊली यांना सर्वोच्च स्थान आहे, यांचे अनंत उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही असे सांगून मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली.