मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी

या दोन प्रमुख निर्देशांकांनी आतापर्यंतची गाठली सर्वोच्च पातळी

0

मुंबई : अमेरिकेतील सत्तांतर, परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि करोना प्रतिबंधात्मक लसीबाबत आलेल्या शुभसंकेतांनी आज मंगळवारी शेअर बाजारात दिवाळीच साजरी होत आहे.चौफेर खरेदीमुळे बाजारात तेजीची आतषबाजी सुरू आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला असून निफ्टी ८५ अंकांची झेप घेतली. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान लाखभर कोटींनी वाढली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाल्याचा आनंद जगभरातील भांडवल बाजारांत दिसून आला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने आठवड्यातील सलग दुसऱ्या सत्रात आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. सेन्सेक्स सर्वोच्च पातळीवर असून सध्या सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला असून तो ४२९०५ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह १२५४५ अंकावर ट्रेड करत आहे. याआधी सोमवारी सेन्सेक्स ७०४.३७ अंक उसळत ४२,५९७.४३ वर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १९७.५० अंक वर जात १२,४६१.०५ वर स्थिरावला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाल्याने जगभरातील भांडवली गुंतवणूकदार खूश झाले आहेत. बायडेन यांच्या विजयामुळए आशियाई बाजारांना चांगलाच फायदा झाला. ब्लूमबर्गच्या मते सर्वच निर्देशांक वरच्या पातळीवर आहेत. त्यामुळे बाजारांत सकारात्मक संकेतांचे आगमन झाल्याचे दिसून येत आहे. फायझर कंपनीने करोना प्रतिबंधात्मक लस ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. कंपनीने नुकताच लसीच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे करोना रोखण्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शिवाय विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआय़आय) नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत चालू महिन्यात एकूण १३.३९ हजार कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. देशांतर्गत कंपन्यांनी सप्टेंबरअखेरीस संपलेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. बाजारातील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या तिमाहीचे निकालही चांगलेच लागण्याची शक्यता आहे. आज बँका, वित्त संस्था, स्थावर मालमत्ता, ऑटो, फार्मा कंपन्यांच्या शेअरला मागणी आहे. इंडियन हॉटेल, फायझर, युनायटेड ब्रुव्हरीज, आयशर, लेमन ट्री , येस बँक, आयसीआयसीआय बँक, आरबीएल, एलअँडटी, जेके सिमेंट, एचडीएफसी, बजाज फायनान्स, एसबीआय, टाटा पॉवर, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, अंबुजा सिमेंट या शेअरमध्ये वाढ झाली आहे. मुथूट फायनान्स, आयपीसीए लॅब, एल अँड टी इन्फोटेक, सिप्ला, जुबिलंट फुड, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, जस्ट डायल, नेस्ले या प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.