ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे काळाच्या पडद्याआड
प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबई : प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. काल रात्री 12.30 वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा शालेय जीवनापासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये त्या प्राध्यपिका म्हणून रुजू झाल्या. दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय या कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले. त्यानंतर त्या रुईया कॉलेजमधून निवृत्त झाल्या. पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव, एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित इत्यादी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिला. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकाविषयी आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर यासारख्या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी कायम उत्सुकता असे. साहित्यात नाटक हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत होता. त्या क्षेत्रात त्यांचा प्रत्येक शब्द वजनदार मानला जातो. डॉ. श्रीराम लागू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुष्पाबाईंच्या संपादनाखाली निघालेला ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो. निडरपणा म्हणजे काय, याचे उदाहरण म्हणून पुष्पाबाईंकडे पाहता येते.
मुंबईतील मराठी माणूस कमी होत असल्याची चर्चा सतत होते. पण त्यांनी या विरोधात 25 वर्षांपूर्वी आवाज उठवला होता. मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्यास मराठी माणसांचे कैवारी म्हणवून घेणारेच जबाबदार असल्याचं सांगितले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रस्थानी होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुष्पाताई भावे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्राध्यापक पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढयाची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.