कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी, राज्य सरकार सज्ज : आरोग्यमंत्री टोपे
सरकारने दिलेले नियम-अटी महत्त्वाच्या, नागरिकांनीही त्याचे पालन करणे गरजेचे
जालना : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
सध्या युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. या संदर्भातील बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडेदेखील कोरोनाची दुसरी लाट येईल का, अशी चर्चा सुरू आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे”, असे राजेश टोपे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून आपण ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हळूहळू सर्व अनलॉकिंग करायला सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सुरू होत आहे. याआधी लग्नसमारंभात 50 लोकांना परवानगी दिली होती. आता या संख्येतदेखील वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचे टोपे यांनी सांगितले. दिवाळीनंतर यावर सरकार निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.“दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. सरकारने घालून दिलेले नियम-अटी महत्त्वाच्या आहेत. मास्क वापरणं गरजेचे आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे”, असे टोपे म्हणाले. दुसरीकडे मंदिरे उघडण्याच्या मागणीवर गेले अनेक दिवस विरोधक आंदोलन करत आहेत. लवकरात लवकर मंदिरे उघडली गेली पाहिजेत, अशी मागणी विरोधक करत आहेत. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, “आम्हालाही मंदिरे बंद राहावेत, असे वाटत नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील”.