सरदार बूटासिंग, लोकनेते बाळासाहेब पवार आणि महाराष्ट्रातील सत्तांतर

बाळासाहेब पवार (अप्पा) आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचे संबंध, या नात्याचा मी जवळचा साक्षीदार

0

औरंगाबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आठवेळा लोकसभा सदस्य, केंद्रीय गृहमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री आणि क्रीडा मंत्री राहिलेले सरदार बूटासिंग यांचे नुकतेच २ जानेवारी २०२१ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे अन् माझे वडील बाळासाहेब पवार (अप्पा) आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचे संबंध आणि नात्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. त्यांच्या निधनाची बातमी आली, तेव्हाच त्या सर्व आठवणी डोळ्यासमोरून ओझरत गेल्या. खरे पाहता, त्याचदिवशी हे सर्व लिहायचे होते, परंतु माझ्या प्रकृतीच्या कारणांस्तव लिहू शकलो नाही. माझ्याप्रमाणे या घटनेचे अनेक नेते आणि पत्रकारही साक्षीदार आहेत.
तब्बल नऊ वर्षांनंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत १९८७ मध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावात येऊन या पक्षप्रवेशाला स्वागत करण्यासही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अनुत्सुक होते. कारण, विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्यास कोणीही धजत नव्हते. यावेळी तत्कालीन खासदार बाळासाहेब पवार यांनी पुढकार घेऊन मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना हाताशी करत पक्षाच्या हितासाठी शरद पवार यांचे शहरात व पक्षात जंगी स्वागत केले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद शहरात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. त्यामुळे काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा स्पष्ट संदेश दिला गेला.
या पक्षप्रवेशानंतर अवघ्या वर्षभराच्या अंतराने औरंगाबादमध्ये जातीय दंगली उसळल्या. या दंगलीवर नियंत्रण मिळविण्याकरिता आठवडाभर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दंगलीमुळे अल्पसंख्यांक समाजाचा काँग्रेसवरचा विश्वास ढळत चालल्याचे चित्र औरंगाबादसह महाराष्ट्रात निर्माण होत होते. ही परिस्थिती निवळण्यासाठी बाळासाहेब पवार यांनी शरद पवारांशी सर्व समाजात काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, यावर चर्चा केली. त्याकरिता महाराष्ट्रात नेतृत्त्व बदल व्हावा, अशी भावना व्यक्त केली. यावर शरद पवारांनी या भूमिकेच्या परिणामांची जाणीव अप्पांना करून दिली. नेतृत्त्व बदलाची मागणी करणे म्हणजे राजकीय आत्महत्या होऊ शकते, असे सांगितले. मात्र, परिणामांची चिंता न करता पक्षाच्या हितासाठी अप्पांनी महाराष्ट्रातील नेतृत्त्व बदलाबाबत औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रपरिषदेत अप्पांनी सांगितले, ‘औरंगाबाद शहरात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजात काँग्रेस पक्षाची प्रतिमा ढासळत चाललेली आहे. त्यांच्यात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी नेतृत्त्व बदल आवश्यक आहे. ते न झाल्यास माझ्यासह पक्षातील आमदार आणि खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.’ दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये या बातम्या ठळकपणे प्रकाशित झाल्या. विशेष म्हणजे १९८५ च्या लोकसभेत काँग्रेस पक्षाने राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकतर्फी मोठा विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातील या दबावाला बळी पडून सहजासहजी महाराष्ट्राचे नेतृत्त्व बदल करण्याचा निर्णय पक्ष घेण्याची परिस्थिती नव्हती. त्यादृष्टीने अप्पांनी मोठी राजकीय जोखीम  पत्करली होती. तरीही या बातम्यांमुळे दिल्लीत पक्षश्रेष्ठींचे धाबे दणाणले होते.
नवी दिल्ली येथे बसलेल्या पक्षश्रेष्ठींनी या विषयावर चर्चा करून तात्काळ तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार बुटासिंग यांना दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पाठविण्यात आले. यानंतर सरदार बुटासिंग यांनी अप्पांशी सर्व समाजात एकोपा निर्माण करण्याबाबत चर्चा केली. अवघ्या काही दिवसांत दिल्लीत सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. एकेदिवशी अचानक शरद पवारांचा अप्पांना फोन आला आणि त्वरित दिल्लीत येण्यास सांगितले. यादरम्यान नेतृत्त्व बदलाचा निर्णय होऊन २६ जून १९८८ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शरद पवार यांनी शपथ घेतली. तसेच शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री पदावरुन केंद्रीय अर्थमंत्री पदावर वर्णी लागली होती. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा एक मोठा तख्ता पलटला होता. यात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार बुटासिंग यांची भूमिका मोठी होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सत्तांतर होतांना आम्ही जवळून बघितला. भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
यावरून अप्पांची जोखीम पत्करण्याची क्षमता, पक्षहितासाठी दाखवलेली हिंमत, राजकीय भवितव्य पणाला लावण्याची मानसिकता दिसून येते. या घटनेनंतर महाराष्ट्राला शरद पवारांच्या रुपाने सक्षम नेतृत्त्व मिळाले. या घडामोडीनंतर अप्पांनी कधीही वैयक्तिक किंवा राजकीय लाभासाठी प्रयत्न केले नाहीत. त्याउपर महाराष्ट्राच्या हितासाठी आपले सर्वस्व पणाला लावण्याची मानसिकता दिसून येते.
(लेखक – मानसिंग पवार)
टिप : लेखक – मानसिंग पवार बाळासाहेब पवारांचे चिरंजीव आहेत )

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.