श्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी, पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, हरीतवारीचा संकल्प
हेलीकॉप्टर मधुन पालखीवर पुष्पवृष्टी
पैठण प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बावने ) :
श्री संत एकनाथ महाराजांची मानाची दिंडी आणि पालखी गुरुवारी (5 जुलै) दुपारी 12 वाजता गावातील नाथ मंदिरातून नामदेव एकनाथाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले, हजारो वारकरी नाथाच्या नाम घोष करत टाळ मृदंगच्या गजरात तल्लीन होऊन गेलेले दिसत होते.
नाथांच्या देवघरातील पादुका पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी ह.भ.प. श्री रघुनाथबुवा पालखीवाले हे पालखी घेऊन हजारो वारकर्यांच्यासह गावातील मंदिरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.
दुपारी बारा वाजता पालखी निघाल्यानंतर बाहेरील नाथ समाधी मंदिरात चार वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी थांबलेली होती. तसेच दुपारी चार वाजता गागाभट्ट चौकात ओट्यावर साडे सहा वाजेपर्यंत गावातील भाविका आणि पंचक्रोशीतील गावकर्यांसाठी दर्शनाकरिता पालखी ठेवण्यात आली होती.
यावर्षी प्रथमच संत एकनाथ महाराज यांची पालखी प्रस्थान झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने हेलीकॉप्टर मधुन पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावर्षी पालखी सोहळ्यात विशेषत्वाने “स्वच्छ वारी निर्मल” वारीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्लास्टीकचा वापर अजिबात होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. सोहळ्यामध्ये चालणाऱ्या सर्व दिंडी प्रमुखांना पालखी सोहळा प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी तशा सूचना दिल्या आहेत.
हरित वारी :
हरीतवारी यावर्षीपासुन पालखी सोहळ्यात प्रत्येक मुक्कामी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, या उपक्रमाची सुरूवात पैठण येथून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी भास्कर तात्या कुलकर्णी, पोलिस उप आयुक्त स्वप्निल राठोड यांच्या सह विविध शासकीय अधिकारी यांची पालखी प्रस्थानच्या वेळी प्रमुख उपस्थित होते.
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरांच्या दिंडीला शुभेच्छा :
संत एकनाथांची पालखीही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची मानाची पालखी आहे, सोहळ्यात येणाऱ्या सर्व अडीअडचणी शासनाच्या वतीने सोडवण्यात येतील. पांडुरंगाला चांगला पाऊस पडु दे, माझा मराठवाडा सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे घालुन वारकर्यांना आपली वारी सुखकर आणि शांततेत व्हावी अशा शुभेच्छा आयुक्त भापकारांनी दिल्या.