सोने-चांदीवर संक्रात ; नफेखोरीने सोने-चांदी गडगडले, आजचा दर
आज सकाळपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण
मुंबई : कमॉडिटी बाजारातील सोने आणि चांदीवर नफेखोरीने आज संक्रात ओढवली आहे. आज सकाळपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने ४५० रुपयांनी तर चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाली.
देशात कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील करोना संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अमेरिकेतील राजकीय अस्थिरता निवळल्याने कमॉडिटी बाजारात गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधून पैसे काढून घेण्यास सुरवात केली आहे. त्याचे पडसाद आज देशातील कमॉडिटी बाजारावर उमटले. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४८९३६ रुपये आहे. त्यात ३६९ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी तो ४८७८९ रुपयांपर्यंत खाली आला होता. एक किलो चांदीचा भाव ६५४२५ रुपये असून त्यात ५९६ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दर ६५०५५ रुपयांपर्यंत खाली गेला होता. ज जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८४० डाॅलर आहे. त्यात ०.९ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रती औंस २५ डाॅलरच्या आसपास आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोना विषाणूविरोधातील युद्धात मदतीकरिता अतिरिक्त प्रोत्साहनपर पॅकेजला पाठिंबा दिल्याने बुधवारी जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले व १,८४४.७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेची बिकट होत जाणारी स्थिती आणि विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी वाढली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.