संजय राऊत लीलावती रुग्णालयात होणार दाखल, तयारी अँजिओप्लास्टीची
शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना जाणवतो काहीसा ताण आणि थकवा
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आहेत. डॉ. अजित मेनन हे सुद्धा मुंबईस्थित हृदयविकार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीही डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांनीच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती.संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे. राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाईल. संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कामात व्यस्त आहेत. खासदारपद, पक्षाचे मुख्य प्रवक्ते, ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादकपद, महाविकास आघाडीचे शिल्पकार अशा विविधांगी भूमिका ते बजावतात. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी चर्चा, पक्षाची आगामी रणनीती अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात.
राऊतांच्या हृदयात गेल्या वर्षी दोन ब्लॉकेज
संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस आढळले होते. संजय राऊत हे 11 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले. लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजस असल्याचं आढळले. त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. लीलावती रुग्णालयात डॉ. मॅथ्यू यांनीच संजय राऊतांची अँजिओप्लास्टी केली होती.
अँजिओग्राफी म्हणजे काय? : हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी जी चाचणी केली जाते त्याला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयविकार आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होते. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते. ही चाचणी सोपी, सुरक्षित आणि पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारी आहे. रुग्ण पूर्णवेळ जागा असतो केवळ लोकल अॅनेस्थेशियाच्या खाली ही चाचणी केली जाते. इतकेच नाही तर या तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णाशी संवादही साधत असतो.