संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर आज दुपारी स्वाक्षरी

0

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, हा राजीनामा आज राज्यपालांनी मंजूर केला आहे. दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.

रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय, अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होते की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचे म्हणणे असे होते की, राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यावर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे पोहोचलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली असून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत.

मंत्रिपद वाचवण्यासाठी राठोड यांचे शेवटपर्यंत प्रयत्न
राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा, अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपले मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.

काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.