संजय राठोडांंचे मंत्रिपद राहणार की जाणार?, शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक; निर्णयाची शक्यता
सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, पूजा चव्हाण प्रकरणामुळे विरोधकांचा आक्रमक पवित्रा
मुंबई :सोमवारपासून सुरु होणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पूजा चव्हाण प्रकरणामुळे विरोधकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवसेनेची तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राठोड यांचे मंत्रिपद राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 6.30 वाजता ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि काही मोजक्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असून उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे. त्यातच विरोधकांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन सुरू देणार नाही, असा इशाराही विरोधकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असून त्यात राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
चहापानापर्यंत राठोडांचा राजीनामा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी विरोधकांसाठी सत्ताधारी आघाडी सरकारने चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे. या चहापानापूर्वीच राठोड हे राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अधिवेशनाची ठरवणार रणनीती
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणापासून ते कोरोना परिस्थितीपर्यंतच्या अनेक मुद्दयांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांना तोंड देण्यासाठी काय रणनीती असली पाहिजे, यावरही मुख्यमंत्र्यांची शिवसेना नेत्यांसोबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
आंतर मनाचा आवाज ऐकला तर राजीनामा घेतील : मुनगंटीवार
खुर्चीचा आवाज किंवा सत्तेचा आवाज ऐकला तर ते राजीनामा मागणार नाहीत. पण उद्धव ठाकरेंनी आंतरमनाचा आवाज ऐकला, बाळासाहेबांच्या आंतरमनाचा आवाज ऐकला तर ते संजय राठोड यांचा राजीनामा मागतील. राजीनामा मागितला याचा अर्थ राजकारणात नुकसान होते, असे समजण्याचे कारण नाही. कधीकधी यातून आपली प्रतिमा, परंपरेचा गौरव होतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, याची कल्पना नाही. कारण बैठक शिवसेनेची आहे. पण उद्धवजींच्या मनात याबाबत द्वंद्व जरुर असेल. इतक्या घटना झाल्यानंतर राजीनामा म्हणजे शिक्षा नाही. राजीनामा म्हणजे राज्याच्या पंरपरेचे पाईक होणे आणि पालन करणे आहे, असेही ते म्हणाले.