संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता!; पवार मुख्यमंत्र्यांशी काय बोलले?
शक्तिपीठावरील शक्तिप्रदर्शन वनमंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे, या संपूर्ण प्रकारावर शरद पवारही नाराज
मुंबई :पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज कोरोना संदर्भातील नियमांची पायमल्ली करत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावरून मोठे वादळ उठले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सगळ्याच प्रकारावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
पवार यांनी आज सायंकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पूजा चव्हाण प्रकरण व पोहरादेवीत आज जे घडले त्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणींत अधिकच भर पडण्याची चिन्हे आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर ऑडिओ क्लिपच्या आधारावर संजय राठोड यांच्यावर भाजपकडून थेट आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चौकशी सुरू आहे. दरम्यान, गेल्या १४ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज बंजारा समाजाची काशी, अशी ओळख असलेल्या पोहरादेवी गडावर दाखल झाले. तिथे त्यांनी दर्शन घेतले व माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी राठोड समर्थक व बंजारा समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. पोहरादेवी धर्मपीठ वाशीम जिल्ह्यात असून या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना हे शक्तिप्रदर्शन एका मंत्र्यानेच केल्याने राठोड आणखी गोत्यात आले आहेत.
मुख्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात येत असल्याचे बजावून सांगितले होते. त्यानंतरही शिवसेनेच्याच एका मंत्र्याने गर्दी जमा करून नियम मोडल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे. संजय राठोड यांच्याबाबत एकूणच शरद पवार यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संजय राठोड यांच्यावर जे आरोप होत आहेत व आज पोहरादेवी येथे जो प्रकार घडला ते पाहता, सरकार आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला फटका बसत आहे. त्यामुळेच तपास पूर्ण होईपर्यंत राठोड यांनीच पदापासून दूर राहावे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला असून राठोड यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
पोहरादेवी येथे आज सकाळपासून संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीबाबत माध्यमांत आलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली व कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. वाशिमचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना याबाबत अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांना त्यांनी दिल्या आहेत.