सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल

भाजपमधील नाराजीचा फायदा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्तांतरासाठी व्यूहरचना सुरूची माहिती

0

सांगली :  सांगली महापालिका महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर आली आहे. भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. घोडेबाजार सक्रिय होऊन नगरसेवकांची पळवापळवी होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात धाकधूक वाढली आहे. भाजपमधील नाराजीचा फायदा उठवत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्तांतरासाठी व्यूहरचना सुरु झाल्याची माहिती आहे. येत्या 23 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.

सत्ताधारी भाजपमध्ये फूट

महापौर, उपमहापौर निवडीवरून सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये फूट पडल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली असून ते नॉट रिचेबल आहेत. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. रात्री तीन नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. त्यानंतर रात्री उशिरा तीस नगरसेवकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये

महापौर, उपमहापौर निवडीवरुन भाजपमध्ये कुरबुरी सुरू होत्या. बुधवारी सायंकाळी महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित झाले. भाजपची नावे निश्चित होताच, राष्ट्रवादीचे नेते ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू झाले. महापौर, उपमहापौर निवडीत सध्या ‘मनी पॉवर’ची चर्चा रंगली आहे. भाजप आणि विरोधी आघाडीकडून घोडेबाजाराला ऊत आला आहे. भाजपपुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उलथवण्यासाठी पाच नगरसेवकांची गरज आहे. सध्या नऊ नगरसेवक गायब आहेत. त्यापैकी किती जण आघाडीच्या गळ्याला लागतात, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.

सांगली महापौरपदासाठी इच्छुक होते कोण ?

सांगलीच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. सांगलीचे महापौरपद खुले असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. सत्ताधारी भाजपकडून महापौर पदासाठी स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धीरज सूर्यवंशी, गणेश माळी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ज्यास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगलीत येऊन बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.