संभाजी भिडे यांच्या संघटनेत अखेर उभी फूट; नव्या संघटनेचा ‘हा’ निर्धार
संघटनेचे निलंबित कार्यवाह नितीन चौगुले यांनी नव्या संघटनेची घोषणा
कोल्हापूर : संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेत अखेर फूट पडली असून संघटनेचे निलंबित कार्यवाह नितीन चौगुले यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान या संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत.
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेमध्ये गेले काही दिवस वाद सुरू होता. या संघटनेतील नितीन चौगुले यांच्याबाबत आलेल्या काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळेचे चौगुले यांनी नवीन संघटनेची स्थापना केली असून शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फूट पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. सांगली येथे मेळावा घेऊन चौगुले यांनी नव्या संघटनेची घोषणा केली. नितीन चौगुले म्हणाले, ‘गेले अनेक वर्षे मी शिवप्रतिष्ठानचे काम करत आहे. पण, कोणतेही कारण न देता मला संघटनेतून निलंबित करण्यात आले. मी अनेकदा भिडे गुरुजींना विनंती केली. पण त्यांनीही आपल्याशी चर्चा टाळली. आपल्याला वेळ दिला नाही. यामुळेच नवीन संघटनेची स्थापना करावी लागली.’ नवीन संघटनेबाबत ते म्हणाले, ‘हिंदुत्व हेच या संघटनेचे मुख्य केंद्र राहील. बेरोजगार युवकांना रोजगार देण्याबरोबरच हिंदुत्व चळवळीत काम करताना ज्यांच्यावर खटले दाखल होतील, त्यांना सोडवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाईल. शिवाजी महाराजांसोबतचे जे मावळे लढायांत धारातीर्थी पडले, त्या मावळ्यांच्या दुर्लक्षित समाधींचा शोध घेऊन तेथे स्मारक बांधण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी एक स्मारक बांधण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. ते म्हणाले, ‘स्वतःच्या फायद्यासाठी भिडे गुरुजींच्या काही सहकाऱ्यांनी मला बदनाम केले. मात्र, मला भिडे गुरुजींबाबत कायम आदर असेल व त्यांनी दिलेल्या आदर्शांवरच नवीन संघटनेचे काम चालेल. ही संघटना राजकारण विरहित असेल.’