भगवा मास्क, हाती शिवबंधन, उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा

0

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले आहे.

विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावले होते. त्यानंतर काही महिन्यांतच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची ऑफर दिली. उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, सर्व भाषांवर प्रभुत्व, राजकीय समज आणि राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी कलाकार कोट्याचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचे म्हटले आहे. एक वाजता पक्षप्रवेशाची ठरलेली वेळ अचूक पाळून उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या टायमिंगचीही चुणूक दाखवली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिला यांनी अवघ्या सहा महिन्यांत पक्षाला रामराम ठोकला होता. मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यांत पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतरही पक्षाने उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवसेनेची ऑफर स्वीकारण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.  45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उर्मिला यांचे ‘रंगीला’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘भूत’, ‘कौन’ यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअ‍ॅलिटी शोंचे परीक्षणही केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.