आरटीजीएसचा बदलला नियम, नवीन नियमामुळे घरात बसून 24 तास करा पैशांचे व्यवहार
नवा नियम लागू मध्यरात्री 14 डिसेंबर 12.30 वाजल्यापासून 24 तास सुरू
नवी दिल्ली : वारंवार पैसे ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वाची बातमी. आपल्या देशातील रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीमचे नियम मध्यरात्री (14 डिसेंबर) 12.30 वाजल्यापासून नियम बदलणार आहेत. ही सुविधा आता 24 तास सुरु राहणार आहे.
नवा नियम लागू झाल्यानंतर दिवस-रात्र आरटीजीएस सुविधा सुरु असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होईल. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक आणि व्यापारी संस्थांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम सध्या भारतात पहिला आणि दुसरा शनिवार सोडून बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सुरू असते. मात्र, ही सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असायची. आरटीजीएस सेवा सकाळी 7 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये सुरु झाला होता. भारतात आरटीजीएसची सुरुवात 26 मार्च 2004 ला झाली होती. त्यावेळी फक्त 4 बँकांना आरटीजीएस सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. आरटीजीएस सुविधेंतर्गत मोठी रक्कम ट्रान्सफर करणे सोपे झाले होते. या सुविधेचा वापर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. आरटीजीएस पद्धतीचा वापर करुन रक्कम तात्काळ ट्रान्सफर करता येते. आरटीजीएस सुविधेद्वारे कमीतकमी 2 लाख रुपये पाठवता येतात.
आरटीजीएस सुविधा देशातील 237 बँका वापरतात. या सुविधेचा वापर करुन दिवसाला 6.35 लाख व्यवहार होतात. आरटीजीएस सुविधेचा वापर करुन दिवसभरात साधारणपणे 4.17 लाख कोटी रुपये ट्रान्सफर केले जातात. यापूर्वी एनईएफटी सेवा सप्टेंबर महिन्यापासून 24 तास सुरू केली होती. रिझर्व्ह बँकेने ही सुविधा 24 तास सुरू करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात संकेत दिले होते. आरटीजीएस सुविधेद्वारे पैसे पाठवल्यास तात्काळ ट्रान्सफर होतात. एनईएफटी सुविधेला पैसे ट्रान्सफर करण्यास वेळ लागतो.