जि.प.शिक्षण विभागाचे छत अपघात स्थितीत; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला
एकीकडे कोरोनाची भीती, दुसरीकडे जि.प.च्या दुर्लक्षामुळे कर्मचारी संकटाच्या खाईत
औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे छत कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता असून, येथील अधिकारी-कर्मचारी दररोज जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे कोरोनाची भीती असताना दुसरीकडे जि.प.च्या दुर्लक्षामुळे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.
जिल्हा परिषदेची इमारत अतिशय जुनी झाली आहे. गेल्या वर्षी अध्यक्षांच्या दालनाचे, छताचे प्लास्टर पडल्याने धावपळ उडाली होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागे टीनपत्र्यामध्ये शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत, आरोग्य विभाग आहेत. यातील काही विभागांनी डागडुजी करून घेतली. परंतु शिक्षण विभागाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाचेही तीनतेरा वाजलेले असून, विस्तार अधिकाऱ्यांचे दालन व कर्मचारी ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणचे लाकडी छत कुठल्याही क्षणी कोसळू शकते. या ठिकाणी दररोज कर्मचारी बसतात. परंतु कोणत्याही क्षणी हे छत डोक्यावर पडू शकते. या भीतीमुळे कर्मचारी हैराण झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या इतर विभागांच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांची दालने चकाचक होत असताना शिक्षण विभागाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातील छत कुठल्याही क्षणी कोसळू शकते. हे संपूर्ण विभागच धोक्यात आलेले असताना जि.प. बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. कोरोनाची भीती असताना आम्ही जीव मुठीत धरून ड्यूटीवर येतो. असे असताना संपूर्ण छतच कधीही पडू शकते आणि आमच्या जीविताला धोका होऊ शकतो. याकडे कोणीतरी लक्ष देणार का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला .