क्षत्रिय मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरू पीठ स्थापन करण्याचा क्रांतिकारी निर्णय

मराठ्यांनी धार्मिक संस्कार जातीतील पुरोहिताकडून करवून घ्यावेत!

0

    मराठ्यांनी धार्मिक संस्कार जातीतील पुरोहितांकडून करवून घ्यावेत. वेदोक्त प्रकरणादरम्यान खुद्द छत्रपती शाहु मराजांना ब्राह्मणी पुरोहीतशाहीचा प्रचंड मोठा मनस्ताप सोसावा लागला. मराठा समाजाने आपले धार्मिक संस्कार आपल्याच जातीतील पुरोहितांकडून करवून घ्यावेत, यासाठी वेदशास्त्रसंपन्न मराठा पुरोहित तयार करण्यासाठी महाराजांनी कोल्हापूरमध्ये “श्री शिवाजी वैदिक विद्यालय” स्थापन केले.

महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर धर्मशास्त्रावरील शंकराचार्य पीठाची मनमानी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी क्षत्रिय मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ स्थापन करण्याचाही क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यानुसार दि. १२ आँक्टोबर १९२० रोजी शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरू पीठाच्या स्थापनेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात आपण क्षात्रजगदगुरु पदाची निर्मिती का करत आहोत, याचे सविस्तर स्पष्टीकरण महाराजांनी दिलेले आहे. क्षत्रिय मराठ्यांच्या जगदगुरु पदासाठी महाराजांनी सदाशिवराव पाटील बेनाडीकर या तरुण गृहस्थाची निवड केली. समाजहिताची तळमळ असणारा असा तरुण व बुद्धिमान व्यक्तीच क्षात्रजगदगुरु या पदासाठी योग्य ठरेल असा महाराजांना विश्वास होता.
दि. ११ नोव्हेंबर १९२० रोजी पाटगावच्या मौनी महाराजांच्या मठात सदाशिवरावांना सशास्त्र पट्टाभिषेक होऊन वैदिक मंत्रांच्या घोषात त्यांना क्षात्रजगदगुरु पदावर स्थापन करण्यात आले.क्षात्रजगदगुरु पीठाची निर्मिती हा महाराजांचा समाजकारण व धर्मकारणातील एक क्रांतिकारी निर्णय होता. वेदोक्त प्रकरणात महाराजांनी मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार मिळवून दिले होते,  मात्र ब्राह्मणांच्या शंकराचार्य पीठाचे मराठ्यांवरील प्रभुत्व नष्ट झालेले नव्हते. आपल्या धर्माचा जगदगुरु म्हणून मराठ्यांना ब्राह्मण जगदगुरुंकडेच जावावे लागत.  आणि ब्राह्मण जगदगुरुंचा सुंभ जळाला तरी पीळ कायम होता. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी प्रकरणात स्वतः महाराजांना त्रास सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मराठ्यांना पुरोहित, व मनमानी शंकराचार्यांच्या धार्मिक जोखडातून मुक्त करण्यासाठी छत्रपतींनी मराठा पुरोहित व मराठ्यांचे स्वतंत्र जगदगुरु पीठ निर्माण केले. मराठ्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीने छत्रपतींचा हा निर्णय ऐतिहासिक व प्रचंड महत्त्वपूर्ण ठरला. आपल्या सरदारांनी व मराठा प्रजाजनांनी आपले धार्मिक संस्कार हे क्षात्रजगदगुरु पीठाच्या मराठा पुरोहितांकडूनच करवून घ्यावेत, अशी आज्ञा दिली. धर्मशास्त्राचा प्रमुख हा राजा असतो. राजा सांगेल तो धर्म, हे छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु पीठ स्थापन करुन पुन्हा एकदा सिद्ध केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.