परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पुराचा फटका शेतीला, पिकांचे नुकसान

काही दिवस पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी भयभीत

0

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. उजनी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले. तसेच वीर धरणांमधूनही भीमा नदीमध्ये पाणी सोडले आहे. यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याने, याचा फटका शेतीला बसला आहे.

परतीच्या पावसाने पंढरपूर परिसरात जोरदार हजेरी लावली. रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.  पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी सकाळपर्यंत पाऊस सुरूच  होता. या पावसाने शेतीचे मात्र मोठे नुकसान झाले. उघड्यावर वाळण्यासाठी ठेवलेला  कांदा पूर्णपणे पावसात भिजला. गाळपासाठी तयार असलेला ऊस शेतात पडला आहे. डाळींबरोबरच  द्राक्ष बागांचे सुध्दा अधिक नुकसान झाले आहे. अजून काही दिवस पावसाचा इशारा असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे खळखळून वाहत आहेत. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिण्याच्या पाण्याचा जरी प्रश्न मिटला तरी यंदा बहरून आलेल्या पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भिजली. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी पीक काढून शेतात झाकून ठेवली होती. परत मागील तीन दिवसांत पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे काढून ठेवलेलं पीक नेता येत नाही. त्यामुळे सोयाबीनसारखे पीक काळे पडण्याची भीती आहे. मात्र या पावसामुळे रब्बीच्या पिकाला फायदा होणार आहे. आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे उमरगा तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे तर उमरगा शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढील दोन तीन दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.