धनंजय मुंडेंबाबत रेणू शर्मा यांचे निवेदन; ‘त्या’ व्हिडिओबाबतही दिले स्पष्टीकरण

रेणू शर्मांनी बलात्काराची तक्रार मागे घेतली असून त्यांनी आपले निवेदन ट्विटरच्या माध्यमातून जारी

0

मुंबई : रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गोत्यात आले होते. मुंडे यांच्यावर यावरून भाजप नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधण्यात येत होता. या सगळ्या गदारोळानंतर आज अचानक रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतल्याने या विषयातील हवाच निघून गेली आहे. विशेष म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतल्यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून एक निवेदनही जाहीर केले. या निवेदनाने मुंडे यांच्यावरील राजकीय मळभ पूर्णत: दूर झाल्याचे दिसत आहे.

धनंजय मुंडे यांनी आपलं लैंगिक शोषण केले व लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली, असा आरोप करून रेणू शर्मा यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे स्पष्ट करत धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. त्याचवेळी रेणू शर्मा यांची मोठी बहीण करुणा यांच्याशी आपले संबंध होते व त्यांच्यापासून आपल्याला दोन मुले आहेत. त्यांना आपण आपले नावही दिले आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असतानाच रेणू शर्मा यांच्यावर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी आरोप केला. आम्हालाही या महिलेने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा या दोघांनी केल्याने या संपूर्ण प्रकरणालाच कलाटणी मिळाली. त्यातून रेणू शर्मा या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आणि याप्रकरणी दोन्ही बाजूने चौकशी सुरू झाली. दरम्यान, प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच आज रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रेणू यांनी ट्वीटरच्या माध्यमातून एक लेखी निवेदनही जाहीर केले आहे. त्यांनी हिंदीतून आपली भूमिका मांडली आहे.

रेणू शर्मा यांचे निवेदन…

मी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध लग्नाचे वचन देऊन ते न पाळल्याचा आणि बलात्काराचा जो आरोप केला होता, त्याबाबत माझे निवेदन खालीलप्रमाणे आहे…
मी स्पष्ट करू इच्छित आहे की, माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून मतभेद निर्माण झाले आहेत आणि त्याबाबत न्यायालयात केस सुरू आहे. यामुळे मी मानसिक तणावात आणि दबावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने त्यांच्याविरुद्ध सक्रिय झाला आहे ते पाहता, मी कोणत्या तरी मोठ्या राजकीय षडयंत्राची बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत, असे मला दिसत आहे. हे सर्वच चुकीचे असून मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव खराब करायचे नाही. शेवटी मी इतकेच सांगेन की, धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल तक्रार मी पूर्णपणे मागे घेत आहे. त्यांच्याविरुद्धच्या कोणत्याही तक्रारीचा मी आता पाठपुरावा करणार नाही. मला लग्नाचे वचन देऊन ते न पाळल्याची आणि बलात्काराची माझी आता कोणतीही तक्रार नाही, हे मी रेकॉर्डवर सांगत आहे. त्यांच्यासोबत माझा कोणताही आक्षेपार्ह फोटो वा व्हिडिओ नाही, हेसुद्धा मी नमूद करत आहे. हे स्टेटमेंट मी अत्यंत जबाबदारीने आणि सजगपणाने देत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.