मुंबईत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

मुंडे म्हणाले- बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी खोटे आरोप

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून आपण मुंडेंचे नातेवाईक असल्याचा दावाही या तरुणीने केला आहे.
तरुणीने 10 जानेवारी रोजी तक्रार दिली होती. 11 तारखेला मुंबई पोलिसांनी तरुणीचा अर्ज स्वीकारला. दरम्यान धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

बलात्काराच्या आरोपावर नेमके काय म्हणाले धनंजय मुंडे…

कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्कारावर आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्ख्या लहान बहीण आहेत.) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत. या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.
मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवितास गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. याबाबत (ता.12) नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलिसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खासगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात, असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यांसाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्याच दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत. या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की, या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे, अशी विनंती आहे. तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत. यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींच्या प्रतीदेखील समाज माध्यमांतून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांचा मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएस रूपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे, या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. मला खात्री आहे की, या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल, तथापि माझी आपल्याला विनंती आहे की, सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. कारण सदर प्रकरणी श्रीमती करूणा शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी दोन अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे. त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती. ”

तरुणीने काय केले आरोप ?

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, 2006 पासून माझ्यावर अत्याचार सुरू होते. पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. तसेच याचे व्हिडिओ काढून धमकावले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पंतप्रधान व देवेंद्र फडणवीसांकडे मदतीची साद
पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने तरुणीने मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई पोलिस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टॅग करत याबाबत माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र यांना सोशल मीडियावर टॅग करत मदतीची साद घातली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.