रावसाहेब दानवे – पंकजा मुंडे गटाच्या सुप्त संघर्षात रखडल्या नियुक्त्या

कार्यकारिणी निवडीचा वांधा : खैरे- दानवे गटांत सत्ता संघर्षाची शक्यता

0

औरंगाबाद : कार्यकर्त्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा, पक्षशिस्त झुगारण्याची बळावलेली वृत्ती आणि बदललेले राजकीय समीकरणामुळे शहर जिल्हा कार्यकारिणी निवडताना भाजप नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. दुसरीकडे शिवसेनेतही आता फेरबदलाचे जोरदार वारे वाहू लागल्याने तिथेही बदल अटळ दिसतो आहे. या दोन्ही पक्षांत उठलेले वावटळ केव्हा वादळाचे स्वरूप घेईल, याचा नेम नाही. लाख प्रयत्न करूनही कार्यकर्ते नेत्यांच्या ताब्यात राहणार नाही, अशी परिस्थिती आहे.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया रेंगळली असून अद्यापही पूर्ण झालेली नाही. नावांच्या चिठ्ठ्यांचे कागद नेत्यांच्या कोटाच्या खिशात जीर्ण झाले. दर दोन आठवड्यांनी बनवलेली यादी फाडली जाते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर बनवलेली यादीही नव्याने दुरुस्त करण्याचे काम जोमाने सुरू आहे. पक्षात दानवे- मुंडे गटाचा जुनाच वाद उफाळला आहे. शहर आणि ग्रामीणच्या वादात अडकलेली शहराची कार्यकारिणी तर जुन्या-नव्यांच्या खेळात अडकलेली ग्रामीण जिल्ह्याची कार्यकारिणी अजून किती वेळा बदलली जाणार, असा सवाल आता कार्यकर्ते करीत आहेत. शहर कार्यकारिणीवर खा. डॉ. भागवत कराड, आ.अतुल सावे यांचाच वरचष्मा असणार, याची दक्षता घेतली जाते. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेत काही नावांना बदलण्याची मागणी केल्याने तिढा वाढला आहे. कार्यकर्त्यांना युवा मोर्चा तसेच इतर आघाड्यांचे चॉकलेट देऊनही झाले तरीही असंतोष कमी झाला नाही.

शिवसेनेतही खैरे पर्वाचा अस्त होण्याची संधी शोधत असलेल्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी केली आहे. शहर आणि जिल्ह्यावर खैरे समर्थकांची वर्णी सध्या आ. दानवे समर्थकांचा डोळ्यात खुपत आहे. त्यामुळेच जिल्ह्याचे संपर्क नेते विनोद घोसाळकर यांच्या समोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भाकरी फिरवली नाही तर मनपा निवडणुकीत फटका बसू शकतो, असा गुप्त निरोपही देण्यात आला आहे. याच नियुक्त्यावरून अडीच वर्षांपूर्वी राजाबाजार संस्थान गणपती मंदिरात तत्कालीन खासदार खैरे आणि जिल्हाप्रमुख दानवे भिडले होते. त्याचा पुरेपूर वचपा काढण्याची संधी आ. दानवे शोधत आहेत. पक्षात सध्या दानवे गटाची चलती आहे. हे वारे बदलण्यापूर्वीच नियुक्त्यांचा खेळ मांडला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत जर सेनेत नियुक्त्यांचा पोळा फुटला तर त्यांचीही गत भाजप सारखीच होऊ शकते. भाजपमध्ये जसे रावसाहेब दानवे -पंकजा मुंडे गटाच्या सुप्त संघर्षात नियुक्त्या रखडल्या तसाच सत्तासंघर्ष खैरे- दानवे गटात होऊ शकतो. त्यामुळे भाजप आज जात्यात असला तरी शिवसेना सुपात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.