राजमाता जिजाऊ जन्मोत्सव : सिंदखेडराजा येथे जय जिजाऊ, जय शिवरायचा जयघोष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 421 वी जयंती आहे. त्यानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे शिवभक्तांनी गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवण्यासाठी जिजाऊ यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवभक्त आजच्या दिवशी येथे मोठी गर्दी करतात.
त्यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरील जन्मस्थळी आज पाहटेपासून लाखो जिजाऊ भक्तांनी दर्शन घेऊन जिजाऊ यांच्या चरणी नसमस्तक झाले. यावेळी जिजाऊ यांची महापूजा करण्यात आली. यावेळी विविध राजकिय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच जिजाऊंच्या जन्मस्थापनापासून जिजाऊ सृष्टीपर्यंत भव्य मिरणूकही काढण्यात आली. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरणही होणार आहे.
विशेष म्हणजे, यंदा ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील निर्माते आणि संभाजीराजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित राहणार आहे. तसेच छत्रपतींचे वारसदार उदयराजे भोसले, संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार सर्जिकल स्ट्राईक मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रदान केला जाणार आहे.