राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीच्या पिकांवर संकट
ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
मुंबई : हिंद महासागर आणि दक्षिणेकडील अरबी समुद्रात वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, असे वातावरण पुढील काही दिवस राहणार असून ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अचानक पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाची धाकधुक वाढली. अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढचे काही दिवस असेच वातावरण असणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्याची चाहुल काल मुंबईत लागली. होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे कालपासून राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर मुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी हलक्या तसेच रिमझिम स्वरुपाचा पाऊस पाडला. मुंबईत थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.
लासलगावात काढणीच्या पिकांवर संकट
लासलगावात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पाच ते सात मिनिटे झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या द्राक्ष, कांदा, हरभरे तसेच गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतातील काढून ठेवलेला कांदा भिजल्याने कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहापूरमध्येही पाऊस : शहापूरमध्ये रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी अचानक पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. 4 ते 5 मिनिटे सतत पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज
राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे