भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

जळगावमध्ये शिवीगाळ करून भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेकीची खळबळजनक घटना

0

जळगाव : जळगावमध्ये भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना घडली. तसेच या कार्यकर्त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केली आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास  पार पडली. बैठक आटोपल्यानंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी हे बाहेर आले होते. त्यावेळी एक कार्यकर्ता दरवाजातच लोळत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले होते. त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधून निघून गेले. काही वेळाने गिरीश महाजन हे पुन्हा एकदा भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी विजय नावाच्या या कार्यकर्त्याने महाजनांना शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका कारवर दगडफेक सुद्धा केली. या संपूर्ण घटनेबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र, ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, ‘सदरील तरुण हा मद्यपी होता, तो अचानक कार्यालयात आला होता. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही’ असे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला गिरीश महाजन, विजय पुराणीक, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.